ग्रेस माझ्या आवडत्या कवींपैकी एक. त्याच्या कवितांचा अर्थ कळत नाही, जाणवतो. मनात आत आत, खोल कुठेतरी, आपल्यालाच अव्यक्त असलेलं काही...त्याला ग्रेस शब्द देतो. झाडाला जमिनीत खोल कुठेतरी असलेल्या आपल्याच मुळाची ओळख पटावी तसं काही वाटतं.
त्याच्या ओळी मला अशा नेहमीच भेटत असतात. मला 'प्रेम' म्हणजे 'अज्ञात झऱ्यावर रात्री' ऐकू येणारे, फक्त आपलेच, आपल्यासाठीच असणारे पाव्याचे सूर वाटतात. कधी मनाची अवस्था 'माझ्याच किनाऱ्यावरती, लाटांचा आज पहारा' अशी होते. 'तुझ्या तीक्ष्ण हातांत माझी अहंता, तिथे अंत प्रारंभ गे कोठला' ह्या पंक्ती मी माझ्या बाईकला उद्देशून गातो. आणि जिचा आयुष्यातला शोध अजून संपला नाही ती साथिया 'प्राणांवर नभ धरणारी, दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदवणारी' अशी हवी असं वाटतं.
ग्रेसची एक कविता मला कशी भेटली, ते सांगण्यासाठी हा लेखप्रपंच!
मी काम करतो, तेथे माझ्यासोबत माझ्या संघात एक गोड पोरगी आहे, रूपा नावाची. आमचं सारं काम सोबतच होतं. तिचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि मी ज्या दिवसाबद्दल सांगतोय त्या दिवशी ती मधुचंद्राहून येऊन नुकतीच परत कामावर आली होती.
आमच्या संघसहलीबद्दल बरेच विरोप येत होते. बोलता बोलता मी तिला विचारलं, 'तू येणार आहेस का संघसहलीला?' आणि काय सांगू, अशा जबरदस्त अदासे ती म्हणाली, 'नो!'
थोडंसं लांबवलेलं, थोडंसं उद्गागाराच्या, थोडंसं प्रश्नाच्या वाटेनं संपणारं 'नो'. ठसक्यात म्हणलेलं. 'सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट गोष्टीबद्दल का विचारतोय हा!' असा भाव असलेलं 'नो'. आणि त्यानंतरचं तिच्या ओठांवरचं हास्य! मी अक्षरक्ष: खल्लास झालो. एक तेवीस वर्षांचा बॅचलर मी. लग्न ताजं ताजं असतानाचे मोरपंखी दिवस मला फक्त ऐकून-वाचून माहिती. तिच्या त्या 'नो' नं दरवाजा थोऽऽडासा किलकिला करून त्या दिवसांचं मला एक क्षणभराचं दर्शन घडवलं.
मग दिवसभर काही वेगळंच वाटत राहिलं. 'स्पर्शाचा तुटला गजरा' असं काहीबाही मनात येत राहिलं. आणि संध्याकाळी बाईक वरून घरी जाताना पूर्ण कविता मनात उमटत राहिली. मग वाटलं की ग्रेसच्या ह्या ओळी तर 'तिने' 'त्याला' उद्देशून म्हटलेल्या आहेत -
शब्दांनी हरवूनी जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल
गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल
तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ
आणि मग ह्या कवितेतलं क्षितिजांच्या ओळी मिटत असलेलं, पाण्यावर चंद्रखुणा उमटत असलेलं, संध्याकालातून रात्रीकडे जाणारं वातावरण मला दिसलं. 'गात्रांचे शिल्प निराळे - मी गतजन्मीची भूल' म्हणणारी रूपगर्विता मला दिसली. आणि तिचा तो....बावरलेला आणि म्हणूनच पायांत धुळीचे लोळ घेऊन येणारा वारा. मोठाली घरं उडवून लावण्याची क्षमता असलेला. आणि अशा वाऱ्यासमोर भातुकलीचा
खेळ होऊन असलेली, उधळून जाणारी ती.
क्या बात है! मजा आ गया!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
wow dost!!
It was great chaitya!! this is simply great!!
kya najkat se likha hai re!!
itkyaa haluvaar padhatineani bhavna uchambalun aananaare likhan ani gres yaanchi kavitevar lihine ni te hi hridaysparshi!!! Just GR8!!!!suruvaatch grand kelelee aahe....best luck for all future writings....
hi Chaits!!!
mi kahi itka chagla wachak nahiye.. pan tarihi... ekdum zakaaaaaaas story aahe.... scene creation, character intro ...great.... i think u shud continue this.... the poem is zabardast..... i hope there is lot more to come..ofcourse that will also be great .... devane suddha comment lihili aahe ajun kay pahije.....
Post a Comment